त्रिभाषा सुत्र ... हिंदी हरली मग जिंकले कोण ?
इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा नकोच यात दुमत नाही; पण इयत्ता पाचवीपासून हिंदी कम्पल्सरी असताना आजपावेतो महाराष्ट्राचे कोणतेही नुकसान झाले नाही मग आता पहिलीपासून हिंदी कम्पल्सरी केल्यामुळे महाराष्ट्र कसा काय मागे पडणार आहे हे न उलगडलेले कोडे आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणूका जवळ आल्या आहेत. जो तो आपापली पोळी भाजून घेत आहे असाही एक सूर आळवला जातोय ते ही विचारत घ्यावे लागेल. एक राष्ट्र एक भाषा यासाठी हा सगळा खटाटोप चालू आहे असे काही जणांचे मत आहे यावर प्रत्येकाचे मत वेगळे असू शकते पण याने महाराष्ट्राचे नुकसान होणार आहे हे मात्र अतर्क्य वाटते. पाचवीपासून (म्हणजे इयत्ता पहिली पासून चार वर्ग पुढे) हिंदी कम्पल्सरी असताना आजपावेतो महाराष्ट्राचे कोणतेही नुकसान झाले नाही मग आताच कसे काय होणार ? राष्ट्राची स्वतःची एक भाषा असावी यात वावगे काहीच नाही पण नेमकी कोणती भाषा ही राष्ट्र भाषा असावी हे ठरवताना निकषांची मोजपट्टी लावून तज्ञ मंडळी ते ठरवतील. नाहीतरी देशाला स्वातंत्र्य मिळून ७९ वर्ष झाली आहेत तेव्हा राष्ट्राची कुठलीही स्वतःची भाषा नसताना राष्ट्र सुरळीत चालले आहे तेव्हा राष्ट्राची स्वतःची भाषा असणे एवढे अत्यंत गरजेचे आहे असे मला वाटत नाही. पण एक तर्क लावला तर चित्रपटांच्या माध्यमातून हिंदी भाषा भारतभर घरोघर पोचलेली आहे त्यामुळे आजमितीस तरी हिंदीशिवाय राष्ट्र भाषा म्हणून स्वीकारण्यायोग्य दुसरी कोणती भाषा नाही. रोज व्यवहारात हिंदी सर्रासपणे वापरतात आणि शाळेत शिकायला काय प्रॉब्लेम आहे हे मात्र कळत नाही. दक्षिणेतला माणूस उत्तरेत आणि उत्तरेतला माणूस दक्षिणेत गेला तर किमान हिंदीवर काम भागते. भारतात शिक्षण असो की काहीही असो, येथे जेवढे राजकारण होते तेवढे कोणत्या देशात होत असेल असे मला वाटत नाही. ज्याला शिक्षणातले काहीही कळत नाही तेही शिक्षणावर बोलायला लागतात. तूर्तास तरी महाराष्ट्र सरकारने हिंदीच्या कंपलसरीचा जी. आर. मागे घेतला आहे म्हणून बरेच जण जल्लोष करत आहेत की हिंदी हरली...... मग प्रश्न आहे की जिंकले कोण ? मराठीची फरफट तर आहे तीच आहे. दरवर्षी अंदाजे डझनभरपेक्षाही जास्त मराठी शाळा बंद पडत आहेत. मग जिंकल्याचा जल्लोष कोणासाठी आणि कशासाठी ?
Comments
Post a Comment